पारनेर : विविध शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारे अधिवास, उत्पन्नाचे दाखले तसेच इतर दाखल्यांसाठी आता विद्यार्थ्यांसह सर्वांना अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारणे बंद होणार आहे. अधिकारी दाखल्यांवर आता डिजीटल स्वाक्षरी करणार असल्याने सर्व दाखले ई-डिजीटल होणार आहेत. हा अभिनव प्रयोग जिल्ह्यात प्रथमच पारनेर-श्रीगोंदा उपविभागात होणार आहे.नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, महसूलचे उपजिल्हाधिकारी डी.एम.बोरूडे यांनी सामान्य लोकांना लागणाऱ्या दाखल्यांची सेवा सुलभ होण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालविणाऱ्या बेसिकस व महाआॅनलाईन या कंपन्यांना ई-डिजीटल सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांना याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पारनेर, श्रीगोंदा उपविभागाचे प्रांताधिकारी संतोष भोर यांनी ई-डिजीटल ला प्राधान्य देताना पारनेर-श्रीगोंदा तालुक्यात ही योजना तातडीने सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार श्रीगोंद्याचे तहसीलदार डॉ.विनोद भामरे, पारनेरचे तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांनी आपल्या सह्या डिजीटल केल्या असून त्यांना ‘बेसिकस’चे जिल्हा व्यवस्थापक हनुमंत म्हस्के, महाआॅनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक निरज शेकटकर व चेतन शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.पारनेर तहसील कार्यालयात मंगळवारी याबाबत तहसील कार्यालयातील लिपिकांना प्रशिक्षणही देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भोर, तहसीलदार देशमुख, नायब तहसीलदार साधना फुलारी, मंडलाधिकारी गायकवाड, भोंडवे, सचिन शिंंदे यासह सेवा केंद्राचे राहुल माने, श्रीकांत औटी, प्रमोद गोळे, वर्षा गोळे, सचिन पठारे, इंद्रजित देशमुख, राहुल बोरूडे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
दाखले मिळणार ई-डिजीटल
By admin | Published: September 17, 2014 11:36 PM