अहमदनगर : तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत शनिवारी येथील भूईकोट किल्ला परिसरात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी किर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक उपवनसंरक्षक एस. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, एलअॅण्डटीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, आदेश चंगेडिया, डॉ. सुधा कांकरिया यांच्यासह फेथ फाउंडेशनचे कार्यकर्ते, केंद्रीय विद्यालय आणि सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.भूईकोट किल्ला परिसरात साडेसातशेहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनीही आवर्जून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे शासन-प्रशासन यांच्या प्रयत्नाला लोकसहभागाची जोड आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. स्वच्छ हवा सर्वांना हवी असेल, तर पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. केवळ वृक्षारोपण करुन चालणार नाही, तर ती झाडे जगविणे आवश्यक आहे, असे सांगितले.जिल्ह्याला १ कोटी १८ लाख ८६ हजार उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेला ४१ लाख ९८ हजार, वन विभागास ४० लाख १३ हजार, सामाजिक वनीकरण विभागास २२ लाख ६६ हजार आणि इतर यंत्रणांनी १४ लाख ८ हजार असे वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.वृक्षमित्र आबासाहेब मोरे, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वन संरक्षक भागीरथ निमसे, वन विभागाचे सहायक वन संरक्षक सुनील पाटील, रमेश देवखिळे, वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, सागर माळी, वनपाल देविदास पातारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत : पालकमंत्री राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:43 PM