अशोक मोरेपाथर्डी : एम.ए.पर्यंतचे शिक्षण झाले. तरीही नोकरीच्या मागे न लागता आपण आपल्या शेती व जोडधंद्यातून अधिक पैसा कमावू शकतो, असा निर्धार करून शेतीत फळबाग लावून लाखो रुपये कमविण्याची किमया भोसे (ता. पाथर्डी ) येथील तरुण शेतकरी अशोक टेमकर यांनी करून दाखविली. या कामात त्यांचे वडील केंद्रीय पोलीस दलातील निवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुनराव टेमकर व त्यांची पत्नी सविता यांचे सहकार्य लाभले.केंद्रीय पोलीस दलात निरीक्षक पदावर असणाऱ्या अर्जुनराव टेमकर यांनी मुलगा अशोक टेमकर याचे शिक्षण तर केले. मात्र अशोक टेमकर यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पध्दतीची शेती करण्याची आवड असल्याचे वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास पाठबळ दिले. उजाड माळरान, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा परिस्थितीत शेती करणे किती अवघड काम असते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.२००४ साली आपण प्रथम ६५० संत्र्यांच्या झाडांची लागवड केली. ५ वर्ष झाडांची जोपासना केल्यानंतर फळ मिळत गेले. पाण्याची टंचाई असताना प्रसंगी टँकरने विकत पाणी घेवून फळबाग जगविली. आज संत्र्याच्या जोडीला ७०० डाळिंबाची झाडे आहेत. या दोन्ही फळबागातून लाखो रूपयांचा आपणास फायदा झाल्याचे अशोक टेमकर यांनी सांगितले.शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेती परवडत नाही म्हणून वडिलांनी शेळीपालन व दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. शिवाय शेतीला लागणाºया शेणखताचा प्रश्नही मिटत गेला आणि जमीन सुपीक होत गेली. या फळबागाची लागवड करताना कृषी विभाग अथवा अन्य कोणाचेही मार्गदर्शन आपणास मिळाले नसल्याची खंत अशोक टेमकर यांनी व्यक्त केली.
तरुणाची फळबागेतून लाखोची कमाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:12 PM