अहमदनगर : कागदावर झाडे लावून खूप झाली. आता माणसाच्या डोक्यात झाड लावण्याची गरज आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या बांबू लागवडीमधूनच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. झाड तोडले तर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची वेळ भविष्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करून पर्यावरण रक्षणासोबत आर्थिक उन्नतीही करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केले.
पाशा पटेल यांनी पर्यावरण रक्षणासाठी पृथ्वी रक्षण चळवळ सुरू केली आहे. त्याची माहिती पटेल यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. यावेळी मात्री मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नगर भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, किरण पाटील उपस्थित होते.
यावेळी पटेल म्हणाले, संपूर्ण जगातच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. देशात आगामी काळात पेट्रोल-डिझेल बंद होणार आहे. लोक झाडे लावायला तयार नाहीत. त्यामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याने ऑक्स्जिन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या आणि सर्वाधिक कार्बन शोषणाऱ्या बांबूची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. याबाबत जागृती व कृती करण्यासाठी ‘पृथ्वी रक्षण चळवळ’ सुरू केली असून, त्यामध्ये कृतिशील सहभाग घेण्याचे आवाहन पटेल यांनी केले.
ते म्हणाले, आतापर्यंत दोनशे गावांत बैठका घेतल्या आहेत. बांबूच्या सोळा जाती असून, केंद्राने सात जाती लावण्यास परवानगी दिली आहे. एक एकर जमिनीवर २२० बांबूची झाडे लावता येतात. त्यापासून एक लाख रुपये उत्पन्न मिळते. त्याला दुप्पटही भाव मिळतो. आज सात लाख कोटी रुपये इंधनासाठी खर्च येतो. आता बांबूपासून इथेनॉलनिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात शोधले आहे. याशिवाय बांबूपासून सीएनजी, कपडे, फर्निचर, तांदूळ, बिस्कीट, लोणचे तयार करता येणार आहे. बांधकामामध्ये सळईऐवजी १५ टक्के बांबू वापरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. आता यापुढे बांबूला पीक म्हणून शेतात आणायचे आहे. बांबूच्या रोपांसाठी केंद्र व राज्य शासन अनुदान देत असल्याचेही पटेल म्हणाले.
--
फोटो -३० पाशा पटेल
बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू दाखविताना पाशा पटेल. समवेत प्रा. भानुदास बेरड, किरण पाटील.