अहमदनगर : आयात शुल्कात कमी झाल्याने खाद्यतेलाच्या ठोक आणि किरकोळ दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य लोकांचे किचन बजेट पार कोलमडले होते. भाजीला फोडणी देणेही गृहिणींना महाग झाले होते. आधीच कोरोनामुळे रोजगार, नोकरीवर गदा आली होती. त्यात खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे जीणेही कठीण झाले होते. मात्र अशातच खाद्यतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
---------
..म्हणून दर झाले कमी
मागील आठवड्यात केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने बाजारात तेलाचे दर लिटरमागे १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र हेच दर सणासुदीच्या काळात कायम राहतील की नाही, याची खात्री नाही. सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने सोयाबीन तेलही स्वस्त झाले आहे.
- अर्जुन डोळसे, भुतकरवाडी, नगर
--------------
तेलाचे दर (प्रतिलिटर)
तेल ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १६० १५५
सूर्यफूल १८० १७०
करडी १९० १८०
पाम १५० १४०
शेंगदाणा १९० १८०
मोहरी २२० २४०
तीळ २२० २२०
----------------
सर्वच बाबतीत महागाई वाढली आहे. पेट्रोल, गॅस, तेलाच्या किमतीही आधीच वाढलेल्या आहेत. त्यात १० ते १५ रुपयांनी दर कमी झाल्याने त्यात फारसे काही विशेष वाटत नाही. तरीही तेलाच्या किमती कमी झाल्या, त्याचा थोडासा दिलासा मिळालेलाच आहे.
-वर्षा घोरपडे, गृहिणी, शनैश्वरनगर
----------
तेलाच्या किमती कमी झाल्याने किराणा मालाच्या एकूण खर्च कमी झाला आहे. कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येनुसार ५० ते १०० रुपयांची दरमहा बचत झाली आहे. मात्र या किमती स्थिर राहणार का, हाच खरा प्रश्न आहे.
- चंचूबाई कापसे, बागडे मळा, नगर