केडगाव : लहान वयापासून बालके सदृढ व्हावेत. तसेच कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने यात काटकसर केली असून, खाद्यतेल यातून गायब झाले आहे. त्याऐवजी आता साखर देण्यात येत आहे. नगर तालुक्यात २१ हजार ५०१ जणांना लाभ मिळत आहे.
राज्यातील सर्व बालकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी त्यांना सकस आहार देण्याची राज्य सरकारची योजना तालुका पातळीवर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रभावीपणे राबविली जात आहे. नगर तालुक्यात प्रकल्प अधिकारी रफिक अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. शहर व तालुका मिळून तीन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
नगर तालुक्यात एकूण २१ हजार ५०१ लाभार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ होत आहे. तालुक्यातील २४० अंगणवाडी सेविका व २४० मदतनीस यांच्यामार्फत लहान बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ दिला जात आहे.
--
पोषण आहारात काय मिळते..
६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना गहू २८०० ग्रॅम, चवळी- १५०० ग्रॅम, मसूर- १५०० ग्रॅम, या व्यतिरिक्त इतर गटांतील लाभार्थ्यांना हरभरा, हळद, मीठ, मिरची पावडर, आदींचे वितरण केले जाते. काही महिन्यांपासून खाद्यतेलाऐवजी साखर वितरित केली जात आहे.
---
कोरोना काळातही अविरत पुरवठा
कोरोनोसारख्या कठीण काळातही नगर तालुका व शहरात या योजनेतून मिळणारा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत वितरित करण्यात आला. यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे मोठे योगदान आहे. विविध अडथळ्यावर मात करीत त्यांनी हे काम अविरत सुरू ठेवले.
--
यावर्षी २० जानेवारीला आयुक्तांचे नवे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार खाद्यतेलाऐवजी साखर वाटप करण्याचे नमूद करण्यात आले आहे. आता तेलाऐवजी साखर वितरित केली जात आहे.
-रफिक अली सय्यद,
प्रकल्प अधिकारी, महिला-बालकल्याण, नगर तालुका
---
कोरोना काळात अनेकांवर आर्थिक संकटे कोसळली. त्यामुळे खाद्यतेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे होते. तेलासह साखर मिळाली असती तर अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळाला असता.
- दीपाली मरकड, सिंधू हडबे