चंद्रकांत शेळके, अहमदनगर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीयीकृत बँकेत करावेत, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दोन महिन्यांपूर्वीच दिलेल्या असतानाही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र याची अद्याप अंमलबजावणी केली नाही. हेच खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असते तर नुकत्याच नेवासे येथील शिक्षकाच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या वारसाला ४० लाखांचा विमा मिळाला असता. त्यामुळे आता ही नुकसानभरपाई शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी करीत शिक्षक भारती आक्रमक झाली आहे.
निवेदनात शिक्षक भारतीने म्हटले आहे की, जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेत (एस.जी.एस.पी. योजनेअंतर्गत) करावेत, अशी मागणी तीन महिन्यांपासून शिक्षक भारती संघटना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे करते आहे. गेल्या दोन वर्षांपासून पगार राष्ट्रीयीकृत बँकेतच होत होते; परंतु आता हे पगार जिल्हा बँकेत वळविण्यात आले आहेत. शिक्षक भारती संघटनेने पुणे येथे वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा केला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शिक्षण उपसंचालकांनी आदेश देत पगार राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याचे सांगितले; परंतु अद्याप शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही.
राष्ट्रीयीकृत बँकेत पगार जमा झाले तर बँकेकडून ४० लाखांचा अपघाती विमा उतरविण्यासह इतर सुविधा मिळतात. दरम्यान, नेवासा तालुक्यातील श्री घोडेश्वरी विद्यालयाच्या शिक्षकाचे नुकतेच अपघाती निधन झाले. पगार राष्ट्रीयीकृत बँकेत होत असते तर या शिक्षकाला अपघाती ४० लाखांचा विमा मिळाला असता. आता तो शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर कुटुंबास द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सरचिटणीस महेश पाडेकर, राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, संजय भुसारी आदींनी दिला आहे. या मागणीला उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, सहसचिव संतोष निमसे, महिला अध्यक्षा रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, माफीज इनामदार, योगेश देशमुख, सुमंत शिंदे, कल्पना चौधरी, योगेश पाटील, चंद्रशेखर हासे, संपत वाळके आदी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.