कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुले शैक्षणिक प्रवाहात रहावीत, यासाठी शहरातील समर्थ विद्यालयाने ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे.
समर्थ माध्यमिक विद्यालयाने मुलांना ऑनलाइन शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष ऑफलाइन शिक्षणाची सोय उपक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. विद्यालयाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना हसत-खेळत घरीच अभ्यास नावाची पुस्तक मालिका सुरू केली. या अंतर्गत मुलांचा पाया पक्का व्हावा, यासाठी सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक तयार करून ते मुलांना घरी पोहोच केले जाते. मुलांनी ते सोडवून परत करायचे व त्यानंतर त्यांना दुसरे पुस्तक दिले जाते. यावरच न थांबता विद्यालयाने ‘शिक्षण आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात वाचन-लेखन, पाठांतर या पायाभूत गोष्टींवर भर देऊन मुलांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण केली जात आहे. या उपक्रमांचे संस्था संस्थापक अध्यक्ष नामदेव राऊत, सचिव वैभव छाजेड, संस्था निरीक्षिका उषा राऊत यांनी कौतुक केले.