लोणी : शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासात सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचे योगदान मोठे राहिले आहे. शासन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा मतदारसंघ म्हणूनच शिर्डीची ओळख आता होत आहे. ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळातही सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.विविध विभागांच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या योजनांच्या आणि शासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक प्रवरानगर येथील कामगार सांस्कृतिक भवनात विखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राहाता तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील विविध विभागांच्या शंभरहून अधिक अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान विखे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हाधिकारी अनिल कवडे, शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, सभापती निवास त्रिभूवन, उपसभापती सुभाष विखे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.विखे यांनी सांगितले की, या मतदार संघात योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने झाल्याने विकास प्रकल्पांची मालिका उभी राहिल्याचे चित्र पहायला मिळते. यंत्रणेत व्यवस्थित कामकाज केल्यास विकासाची प्रक्रिया ही मानवी जीवनाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच विखे म्हणाले की, योजनेचे महत्व लोकांना अद्यापही समजून द्यावे लागते. यासाठीच शासकीय यंत्रणेने आता जिल्ह्याबाहेरच तालुक्यातील मानवी विकास निर्देशांक ठरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची उभारणी करावी.मतदारसंघातील बहुतांशी प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून शासनाकडे पाचशे कोटी रुपयांची मागणी आपण केलेली आहे. जिरायती भागाला पाणी मिळवून देणे हेच आपले पुढचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाप्रती विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला स्वत: कटिबद्ध व्हावे लागेल. निष्ठा जागरूक ठेवून काम झाल्यास शासनाची प्रतिमा सुधारेल. रघुनाथ बोठे यांनी राहाता तालुक्यात शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. (वार्ताहर)
शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी
By admin | Published: September 07, 2014 11:39 PM