राहुरी : गेल्यावर्षी देशाने २७६ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले असून फळे व भाजीपाल्याचे ३०० दशलक्ष टन उत्पादन घेतले आहे. शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०१७’ या बाराव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य अांतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, आविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉ. प्रमोद पाबरेकर, पुणे येथील फलोत्पादन संचालक व विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. के.व्ही. प्रसाद, वित्त समिती समन्वयक डॉ. विवेक साठे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.डॉ. सिंग यावेळी म्हणाले, आविष्कार-२०१७ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात अभ्यासून संशोधन वृत्तीत सातत्य ठेवल्यास उद्या हेच तरुण तज्ज्ञ सल्लागार म्हणून ओळखले जातील़ आपले संशोधन समाजोपयोगी व वापरण्यास सोपे होण्याकडे लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे.कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, हे युग स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेत हार जीत महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची बुध्दी फार प्रगल्भ असते. त्याला चालना देणे गरजेचे आहे. ‘आविष्कार’ सारख्या संशोधन स्पर्धेमुळे हे साध्य होते. स्पर्धेत सहभागी झाले तर नेतृत्व गुणास चालना मिळते. आपले संशोधन शेतक-यांना कसे फायदेशीर ठरेल?, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविक केले. प्रेमराज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.
कृषी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत - राहुरी विद्यापीठात ए. के. सिंग यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:27 PM