अहमदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी सार्वजनिक नव्हे तर घरातच ईद-उल फित्र साध्या पद्धतीने साजरी केली. सोमवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत घरोघरी नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकमेकांना तसेच फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी ईदनिमित्त नगर शहरातील ईदगाह मैदानात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी मशिदीत सामूहिक नमाज पठण करून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा मात्र कोरोनामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी करण्याचे आवाहन प्रशासनासह सामाजिक संस्था व धार्मिक स्थळांच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ईदची रोनक आणि धामधूम कुठेच दिसली नाही. दरवर्षी विविध ठिकाणी होणारे होणारे ईद मिलनचे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले. लॉकडाऊनमुळे गेली महिनाभर मुस्लिम बांधवांनी घरात राहूनच रोजे ठेवले. ईदनिमित्त दरवर्षी बाजारपेठेत खाद्य पदार्थांसह विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गजबज असायची़ यातून बाजारपेठेत मोठी उलाढाल होत होती. यावर्षी मात्र लॉकडॉऊनमुळे सर्वत्र दुकाने बंद होती. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, हजारो जणांचा रोजगार गेला़ अशा संकटामुळे यंदा अनावश्यक खर्चांना फाटा देत मुस्लिम बांधवांनी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी केली. ईदनिमित्त सामाजिक उपक्रम यंदा दरवर्षीसारखी रमजान ईद साजरी करता आली नसली तरी जिल्ह्यात विविध ठिकाणी मुस्लिम बांधव व सामाजिक संस्थांच्यावतीने ईदनिमित्त गेल्या महिनाभरात सामाजिक योगदान दिलेग़रजूंना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच घरात अदा झाली ईदची नमाज; इतर खर्च टाळून मुस्लिम बांधवांकडून सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 3:42 PM