अहमदनगर : महापालिकेच्या कचरा डेपोतून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लावलेली रोपे मातीत गेली असून, हरित पट्टा विकसित करण्याच्या नावाखाली साडेआठ लाखांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच महापालिकेने मूठमाती दिल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेचा कचरा डेपो बुरुडगाव परिसरात आहे. कचऱ्यामुळे कमालीचे प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी कचरा डेपोभोवती झाडांची लागवड करण्याचा पर्याय पुढे आला. त्यासाठी निविदाही मागविल्या गेल्या. सर्वांत कमी १४.९९ टक्के दराची ए. जी. वाबळे यांची निविदा मंजूर झाली. डिसेंबर २०२० मध्ये खड्डे घेऊन झाडे लावण्यात आली. कचरा डेपोभोवती ७५० राेपे लावण्यात आले; परंतु दोन महिन्यांतच ही रोपे जळाली. रोपांचे एकूण ५ लाख ८५ हजारांचे बिल ठेकेदाराने सादर केले. म्हणजे एक रोप ७८० रुपयांना पडले. साडेसातशे रुपयांना बाजारात ९ ते १० फुटांची झाडे मिळतात. ठेकेदाराने पैसे मोठ्या रोपांचे घेतले; पण झाडे मात्र छोटी लावली. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली. या पाहणी अहवालाच्या आधारे लेखा विभागानेही ठेकेदाराला बिल अदा केले.
महापालिकेत बिल वेळेवर मिळत नाही, अशी ठेकेदारांची तक्रार असते. त्यामुळे अनेक विकास कामे रखडलेली आहेत. कचरा डेपोतील हरित पट्ट्याचे मात्र अवघ्या दोनच महिन्यात बिल अदा केले गेले. हे बिल केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त अयोगाच्या निधीतून अदा करण्यात आले. वास्तविक पाहता हे काम २०१७ मध्ये मंजूर होते; परंतु तीन वर्षे उलटूनही झाडे लावली गेली नाहीत. तीन वर्षांनंतर ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली असून, त्याच ठेकेदाराकडून हे काम करून घेण्यात आले आहे. त्यामुळे या कामाबाबत संशय व्यक्त होत आहे.
...
उद्यान विभागाने केले हातवर
कचरा डेपोतील हरित पट्ट्याबाबत उद्यान विभागाचे प्रमुख मेहर लहारे यांच्याशी संपर्क केला असता लहारे म्हणाले, हे काम २०१७ मध्ये मंजूर झालेले आहे; परंतु जागा उपलब्ध न झाल्याने ठेकेदाराने झाडे लावली नाहीत. त्यास बांधकाम विभागाकडून मुदतवाढ दिली गेली. कामाचे अंदाजपत्रकही बांधकाम विभागानेच केले असून, या कामाचा उद्यान विभागाशीही काही संबंध नाही, असे लहारे म्हणाले.
....
झाडांच्या उंचीची निविदेत अटच नाही
वृक्ष लागवडीचे नियोजन करताना रोपे किती फुटांची असावी, याची अट निविदेतच असते; परंतु महापालिकेने कचरा डेपोतील झाडे लावण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या रोपांच्या उंचीची कोणतीही अट टाकली नाही, हे विशेष.
...
कचरा डेपोत प्यायला पाणी नाही
महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोला भेट दिली असताना तिथे पिण्यासाठीही पाणी नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. झाडांना पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी टाक्या उभ्या केल्या आहेत; परंतु त्यात पाणी नव्हते. टाकीतच पाणी नाही, तर झाडांना पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
...
- हरित पट्ट्याच्या नावाखाली शासनाच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या जातील. प्रति रोपासाठी मनपाने ७८० रुपये ठेकेदाराला दिलेले आहेत. एवढ्या पैशात चांगली मोठी ८ ते १० फुटांची झाडे मिळतात. त्यामुळे हा शासनाच्या पैशाचा एक प्रकारे अपव्यच आहे.
- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, महापालिका