कोल्हार (राहाता) : बेलापूर रस्त्यावरील दत्तनगर परिसरात बेंद्रे गल्लीतील रस्त्यालगत असलेल्या सायकल दुकानात शिरलेल्या धामण जातीच्या सापास सर्पमित्र अमोल शिरसाठ यांनी मोठ्या शिताफीने पकडून बाटलीबंद करीत त्याला जीवदान दिले.आज सकाळी सव्वा बाराच्या सुमारास अतिशय चपळाईने हा साप रस्त्यालगत असलेल्या सायकल दुकानात शिरला. सापाला शोधण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान सापाला पकडण्यासाठी कोल्हार खुर्द येथील सर्पमित्र अमोल शिरसाठ यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दुकानात शोध घेऊन लाकडी कपाटाखाली दडून बसलेल्या या सापास शिताफीने पकडून बाटलीबंद केले. यावेळी उपस्थित रहिवाशांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.हा साप धामण जातीचा व अडीच वर्षांचा असून सुमारे आठ फूट लांब होता. या जातीचा साप केवळ तीन टक्के विषारी असतो. याचा दंश प्राणघातक नसला तरीही त्यामुळे चक्कर, मळमळ अशी लक्षणे दिसून येतात, असे शिरसाठ यांनी यावेळी सांगितले. या परिसरात दोन तीन दिवसांपासून या सापाचा वावर होता. त्यामुळे परिसरातील रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत होते. मात्र या सापास पकडण्यात आल्यामुळे या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.