लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर/बीड : अंबाजोगाई (जि. बीड) येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कोविड कक्षात बुधवारी दुपारी एका तासात सहाजणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर या रुग्णांना इतर गंभीर आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत ‘स्वाराती’च्या अधिष्ठात्यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, श्रीगोंदा (जि. नगर) येथील ग्रामीण रूग्णालयातही बुधवारी ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बुधवारी दिवसभरात कोरोनामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर दुपारी १ ते २ या तासाभरात तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला. या सहा रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नसल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.चाचणीवरही संशयकोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. बुधवारच्या घटनेतील मृत रुग्णांची मात्र घाईगडबडीत ॲन्टिजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. प्रशासनाच्या या गडबडीमुळे संशय व्यक्त होत आहे. नगरमध्ये ऑक्सिजन टंचाईअहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असून, बुधवारी अहमदनगरला ऑक्सिजन पुरवठा करणारे दोन टँकर पुणे जिल्ह्यात अडवून ठेवण्यात आले होते. ते नंतर सोडण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला आहे.
बुधवारी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत कोरोनाबाधित ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. हे मृत्यू दमा, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब व शारीरिक व्याधींमुळे झाले आहेत. यातील बहुतांश रुग्णांचे वय ६०पेक्षा जास्त आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई