शेवगाव: तालुक्यातील जुने दहिफळ हे गाव जायकवाडी जलाशयाच्या काठावर वसलेले, येथे शेतीला मुबलक पाणी. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मात्र कायमच अडचण. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविला. आता मशीनमध्ये पाच रुपयांचा ठोकळा टाकायचा अन् अठरा लीटर शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे. ही योजना आहे. या योजनेमुळे ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
गावाच्या तत्कालीन सरपंच वच्छला पांडुरंग हाके यांच्या कार्यकालात ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. २०१४ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच आरओ प्लांट मशीन बसविण्यात आले. या मशीनलगत कॉइन बॉक्ससारखे यंत्र बसविण्यात आले आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक बिगर तोटीचा नळ बसविण्यात आला आहे. त्या कॉइन बॉक्समध्ये पाच रुपयाचा ठोकळा टाकला की, त्या नळाद्वारे शुद्ध फिल्टर झालेले निर्जंतुक पाणी भांड्यात पडते आहे. ग्रामपंचायतच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.
------------------------
दररोज अडीच हजार लिटर पाणी मिळते
या योजनेतून उन्हाळ्यात दररोज सरासरी ७५० तर इतरवेळी ५०० रुपये जमा होतात. सरासरी दोन ते अडीच हजार लिटर पाणी रोज जाते. त्यातून ग्रामपंचायतीचे वीजबिल व इतर खर्च भागतो. ग्रामपंचायतीने सोलर सिस्टिमची नुकतीच उभारणी केली असून यामुळे वीजबिलाचा प्रश्नही मिटणार आहे. लवकरच ग्रामपंचायत हद्दीतील वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात पीठ गिरणी उभारण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक अभिमन्यू गोरे, सरपंच शबाना जावेद शेख यांनी सांगितले.