सुपा : तब्बल अठरा महिन्यांनंतर पारनेर तालुक्यातील सुपा येथील माध्यमिक विद्यालयाची घंटा वाजली व आठवी ते बारावीच्या मुलांची शाळा भरली. पाठीवर सॅक घेऊन आलेल्या गणवेशधारी मुले, मुली यांच्या उपस्थितीने शाळेला जणू आनंदाचे भरते आले. भयानक शांततेच्या ठिकाणी तब्बल दीड वर्षानंतर वर्गातून अध्ययन अध्यापन सुरू झाले.
सुपा येथील माध्यमिक विद्यालय सुरू झाले असले तरी सुपा परिसरातील छत्रपती शिवाजी विद्यालय (रांजणगाव), वाळवणे येथील श्री भैरवनाथ विद्यालय बंद असून, या विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ही विद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे सांगितले जाते. वाडेगव्हाण येथील प्रभू विद्याधाम नियमितपणे सुरू असल्याचे या सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले. रुई छत्रपती येथील दहावीचा वर्ग सुरू करण्यात आला असून, उर्वरित वर्ग अद्यापि सुरू नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले. वाघुंडे खुर्द येथील बाळानंद स्वामी विद्यालय सुरू असून, त्यांचे नियमित कामकाज सुरू असल्याचे शाळा समितीचे व संस्थेचे अध्यक्ष संदीप मगर यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद असून, त्यात शिकणारे काही विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून दुरावले आहेत. आता आपले शिक्षण थांबले असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. वर्ग बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, असलाच तर त्यासाठी नेट पॅक नाही, तेही उपलब्ध झाले तर रेंज नाही आणि रेंज मिळालीच तर बॅलन्स संपलेला असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले आहेत. कधी पालकांकडे मोबाईल असल्यानेही मुलांना ऑनलाईन वर्गासाठी जॉईन होता येत नाही. यात चिमुकल्यांची दमछाक होऊन त्यांच्या जिवाचा कोंडमारा होतो. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरू होऊन ही आपत्ती संपतेय, याची मुले वाट पाहात आहेत. कोरोनाच्या महामारीने शिक्षण क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले असून, कारखानदारी, उत्पादन क्षेत्र व अन्य क्षेत्रापेक्षा कधीही भरून न येणारे नुकसान शिक्षणाबाबत झाल्याचे जाणकार मंडळींनी सांगतात.
............
पालकांच्या संमतीने स्पर्धा परीक्षेचे वर्ग
अंगणवाडी, बालवाडी, अप्पर केजी, लोअर केजी, पहिली व दुसरी अशा या चिमुकल्याच्या शाळा बंद राहिल्याने व त्यांना ऑनलाईनचा गंधच नसल्याने मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचे अवघड काम गुरुजनांना करावे लागणार आहे. सुप्यातील स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचेही तास सुरू झाले असले तरी पालकांची संमती घेऊनच व सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून वर्ग सुरू करण्यात आले असल्याचे शालेय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.