अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोरों का, ये साथी है चोरों का बातों और दलीलों का, ये है खेल वकीलों का’ हे गीत आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘ये अंधा कानून है’ या चित्रपटातील. आज हे गीत आठवण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी (दि़२२) जिल्ह्यात एका तोतया वकिलाचा झालेला भांडाफोड. न्यायालयाने या वकिलावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या निमित्ताने मात्र न्यायदेवतेच्या डोळ्यात धुळफेक करून कशा तोतया आपले इप्सित कशा पद्धतीने साध्य करतात हे समोर आले आहे.वकिल असल्याचा डंका पिटवून न्यायालयात वकिली करणाऱ्या कर्जत येथील मंगलेश भालचंद्र बापट या तोतयाचा तब्बल आठरा वर्षानंतर भंडाफोड झाला. गेली अठरा वर्षे बापट याने तालुक्यापासून ते जिल्हा व उच्च न्यायालयातही वकिली केली. आरोपी, फिर्यादींच्यावतीने बाजू लढविली. प्रत्यक्षात मात्र त्याच्या वकिलीची सनदच बनावट असल्याचे समोर आले. काळ्या कोटाच्या मागे दडलेल्या या तोतयाने किती जणांना न्याय दिला आणि किती सर्वसामान्यांना लुबाडले याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. बापट १८ वर्षे वकिली करत होता. ही बाब कुणाच्याच कशी निदर्शनास आली नाही. न्यायमंदिरात सत्य मांडून निरपेक्ष न्यायदानाला मदत करणे हे खरे वकिलांचे काम. पदवी आणि सनद घेतल्यानंतर वकिली व्यवसाय करता येते. बापट याने मात्र बनावट कागदपत्रांच्या अधारे सनद घेत न्यायाव्यवस्थेची चेष्टाच केली आहे़ ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने त्यांची प्रकरणे वकिलांकडे देतात. आपल्याला न्याय मिळावा, हिच त्यांची अपेक्षा असते. यासाठी ते वकिल सांगेल ती फी देण्याचा प्रयत्न करतात. वकिली व्यवसायात मात्र असे तोतया आले तर कुणाच्या माध्यमातून न्याय मागायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृन खून झाला तेव्हा हाच बापट आरोपींची बाजू लढण्यासाठी पुढे धावला होता. त्याने जिल्हा न्यायालयात तसा अर्जही सादर केला होता. यावेळी आरोपींनी मात्र सरकारी वकिलांची मागणी केल्याने बापट या खटल्यापासून दूर झाला. युवराज हनुमंत नवसरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज करून मंगलेश बापट हा वकील नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कदाचित नवसरे यांनी असा अर्ज केला नसता तर बापट याची ही तोतयागिरी उजेडात आली नसती. न्यायव्यवस्थेत असे किती तोतया दडून बसलेले आहेत. यासाठी एकदा सर्जिकल स्टाईक होणे गरजेचे आहे.