अहमदनगर - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नाशिक, नगरनंतर ते आता मराठवाड्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून शिंदेगट विरुद्ध शिवसेना असा सामना जागोजागी पाहायला मिळत आहे. तर, आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून होत आहे. त्यामुळेच, एक कॉल, प्रॉब्लम सॉल्व्ह अशी कामे करतानाचा त्यांचे छायाचित्र किंवा व्हिडिओ दिसून येतात. अहमदनगरमधील शाळकरी मुलांची अशीच एक समस्या त्यांनी ऑन द स्पॉट सोडवली.
अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव भातोडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना ही शाळा तातडीने बांधून देण्याबाबत जिल्हा नियोजन समिती फंडातून निधी देण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे, अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन अतिशय सुंदर आभारपत्रक तयार करून मला दिले. एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केले आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मिळालेली ही अतिशय अनमोल भेट ठरली, असे कॅप्शनही दिलं आहे.