केडगाव : नगर शहरातील केडगाव उपनगरातील भूषणनगरच्या एकता मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे घुबडाला जीवनदान मिळाले. सदर घुबड हे चायना मांजात गुंतले होते. गुरुवारी रात्री अग्निशमन दल व मंडळाच्या सदस्यांनी घुबडाला मांजातून मुक्त करून त्याच्यावर उपचार केले.
प्राणघातक चायना मांजावर स्वतःहून बहिष्कार टाकण्याचे वन विभाग व अग्निशमन दलाने नागरिकांना आवाहन केले होते. केडगावच्या भूषणनगरमधील एकता तरुण मंडळाच्या काही सदस्यांना गुरुवारी घुबड चायना मांजात फसल्याचे दिसल्यानंतर, त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दल व वन विभागाला दिली. रात्री अग्निशमन दल व मंडळाच्या सदस्यांनी घुबडाला मांजातून मुक्त केले. शुक्रवारी सकाळी वन विभागाचे पथक येईपर्यंत सदस्यांनी घुबडाचे संगोपन करीत देखरेख ठेवून त्यांच्यावर प्रथमोपचार केले.
वन विभागाच्या पथकातील क्षेत्रपाल सुनील थिटे, वनपाल ए. एम. शरमाळे, वनरक्षक के.एस. साबळे, अग्निशमन दलातील कर्मचारी या ठिकाणी आले. जखमी झालेले घुबड घायाळ झाले होते. हे घुबड दुर्मीळ जातीचे आहे. त्याच्यावर उपचार करून ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यास निसर्गात मुक्त केले जाईल, असे यावेळी मित्रमंडळाच्या सदस्यांना सांगण्यात आले.