प्राणघातक चायना मांजावर स्वतःहून बहिष्कार टाकण्याचे वन विभाग व अग्निशमन दलाने नागरिकांना आवाहन केले होते. केडगावच्या भूषणनगरमधील एकता तरुण मंडळाच्या काही सदस्यांना गुरुवारी घुबड चायना मांजात फसल्याचे दिसल्यानंतर, त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दल व वन विभागाला दिली. रात्री अग्निशमन दल व मंडळाच्या सदस्यांनी घुबडाला मांजातून मुक्त केले. शुक्रवारी सकाळी वन विभागाचे पथक येईपर्यंत सदस्यांनी घुबडाचे संगोपन करीत देखरेख ठेवून त्यांच्यावर प्रथमोपचार केले.
वन विभागाच्या पथकातील क्षेत्रपाल सुनील थिटे, वनपाल ए. एम. शरमाळे, वनरक्षक के.एस. साबळे, अग्निशमन दलातील कर्मचारी या ठिकाणी आले. जखमी झालेले घुबड घायाळ झाले होते. हे घुबड दुर्मीळ जातीचे आहे. त्याच्यावर उपचार करून ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यास निसर्गात मुक्त केले जाईल, असे यावेळी मित्रमंडळाच्या सदस्यांना सांगण्यात आले.
एकता तरुण मंडळाचे प्रवीण सरोदे, व्यंकटेश कुलथे, नीलेश ढाकणे, भूषण कुलथे, गणेश निक्रड, स्वप्निल निक्रड, प्रणिल ढवण, अतुल ढवण, प्रसाद सरोदे, अंशुमन सरोदे, ज्ञानदीप कुलकर्णी, अमोल खरात, स्वप्निल भगत, अक्षय भगत, मुकेश प्रजापती, महेश ढाकणे, भैय्या काटकर, मकरंद बोरुडे, अभिजीत ससाणे या सदस्यांमुळे घुबडाचे प्राण वाचू शकले.