याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत उषन्ना रामन्ना वरगंठे ( वय ७८ ) हे मृत झाले आहेत, तर त्यांची पत्नी शकुंतला उषन्ना वरगंठे (वय ६९ ) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भिंगार येथील द्वारकाधीश कॉलनी परिसरात वरगंठे दाम्पत्य अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा नगर शहरातील सावेडी परिसरात राहतो, तर दुसरा पुणे येथे राहत आहे. उषन्ना वरगुंठे हे कॅन्सरने आजारी होते, तर त्यांची पत्नी शकुंतला यांनाही विविध आजार आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही उपचार घेत होते. मंगळवारी उषन्ना वरगंठे यांनी, आपल्याला रोगराई झालेली आहे, दोघांचाही जगून काय उपयोग? जीवनाला कंटाळलो आहे, असा उल्लेख असलेली चिठ्ठी लिहून ठेवली. त्यानंतर वरगंठे यांनी पत्नीच्या हाताची नस कापून स्वत:च्याही हातावर वार करून घेतला. नस कापल्यानंतर दोघे घरात कोसळले. शेजारी राहणाऱ्यांना ही घटना समजताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत या वृद्ध दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उषन्ना वरगुंठे यांचा मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. शकुंतला यांच्यावर उपचार सुरू आहेत.