शेखर पानसरे ।
संगमनेर : सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सोमनाथ तात्याबा कळसकर व पत्नी नलिनी कळसकर हे वयोवृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून गरजू, गरीब, निराधार मुलींचा सांभाळ करत आहेत. दाम्पत्याने १४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संदिपनी ॠ षी बालिका आश्रमात सध्या २७ मुली वास्तव्यास आहेत. सेवानिवृत्तीनंतर मिळणाºया पेन्शनमधून पालकत्वाची जबाबदारी सक्षमपणे स्वीकारली आहे. ‘देशाने माझ्यासाठी काय केलं, या पेक्षा मी देशासाठी काय केलं’, हे महत्वाचं आहे. या विचाराने वागणारे कळसकर गुरूजी व त्यांची पत्नी नलिनी. या दोघांचाही पेशा शिक्षकाचा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. १९७५ साली गुरूजींची बदली घुलेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. कंजारभाट समाजातील मुलांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी १९७६ साली शाळेच्या जवळच गोकूळ नावाचे वसतिगृह स्व खर्चातून सुरू केले. मुलांचा अभ्यास, जेवण, राहणे अशी सर्व व्यवस्था येथेच करण्यात आली. कंजारभाट समाजातील मुलांचे जीवन समृद्ध करण्यात कळसकर गुरूजींचा मोलाचा वाटा आहे. ही अनेक मुले आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत आहेत. साखर शाळा, वस्तीशाळा, बालवाडी या सारख्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी नेहमीच पुढाकार घेणाºया कळसकर गुरूजींना दिल्ली येथे ५ सप्टेंबर १९८८ ला उपराष्टÑपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्टÑीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी १९८९ साली इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत संगमनेरातील इंदिरानगरमध्ये त्यांनी कळसकर विद्यालय सुरू केले. २ जून २००० ला कळसकर गुरूजी सेवानिवृत्त झाले. परिस्थितीमुळे कोणीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कळसकर दाम्पत्याने त्यांच्या घरीच मुलींची चहा, नाष्टा, जेवण, राहणे अशी सर्व सोय केली. जागा कमी पडू लागल्याने शाळेच्या परिसरात खोल्या बांधत २१ जून २००६ ला संदिपनी ॠ षी बालिका आश्रम सुरू केले. या आश्रमात संगमनेर, अकोले, पारनेर या तालुक्यातील २७ मुली वास्तव्यास आहेत. सर्व खर्च कळसकर दाम्पत्य हे त्यांना मिळणाºया पेन्शनमधून करते. अनेक मुली नोकरीला लागून स्वत:च्या पायावर गुरूजींनी दिलेल्या आधारामुळे भक्कमपणे उभ्या आहेत.
‘प्रयत्न हाच परमेश्वर आहे’ ‘मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे’ आणि त्याच वाटेने आम्ही चाललो आहोत. गरजूंना आधार देण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. उदार मनाची आवश्यकता आहे. इच्छा असली, की मार्ग सापडतो. माणसाचा प्रामाणिक, चांगला हेतू असला की, यश त्याच्यामागे जाते. माणसाला यशामागे धावण्याची गरज नाही. - सोमनाथ कळसकर / नलिनी कळसकर