राशीन (जि. अहमदनगर) मुंबई (वाशी) येथून राशीनला आपल्या मुलीकडे आलेल्या कोरोना संशयित वृध्द महिलेचा मृत्यु झाला आहे. या ६० वर्षीय महिलेस येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत विलगिकरण करण्यात आले होते. त्यामुळे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहुन आलेल्या लोकांमुळे गावकरी धास्तावले आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेस नगर येथे हे पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेले जात होते. मात्र या महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले. संबंधित महिला १३ मे रोजी मुंबई वाशी येथून राशीनला आपल्या मुलीकडे आली होती. त्यांना दम्याचा घशाचा त्रास होत असल्यान १६ मे रोजी संबंधित महिलेची नगरला वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. औषधोपचार देऊन त्या महिलेला राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२०) रात्री या महिलेस दम लागत होता. घसा दुखत होता आणि तापही आला होता. उपचारासाठी त्या महिलेस नगर येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेणे नेले जात होते. मात्र रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस रक्तदाब मणक्याचा विकारही असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी सांगितले. विलगीकरण कक्षात असताना ही महिला कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, यावर प्रशासन आता काम करीत आहेत.
संबंधित महिलेस करोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवत असल्यानेच त्यांची तपासणी करून त्यांना राशींनच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मृत्यूनंतर संबंधित महिलेचा स्वॅप नमुने घेऊन तो तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल रात्री उशिरा अथवा उद्या सकाळी येईल. डॉ. संदीप पुंड, तालुका वैद्यकीय अधिकारी कर्जत