राहुरी : दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड १६ मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवळाली नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. चार वर्षे प्रकाश संसारे यांनी नगराध्यक्षपद म्हणून काम पाहिले. त्यांनी १८ जानेवारी रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त होते. दोन महिन्यापासून उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरणे या संदर्भामध्ये नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडणार आहे. मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी. त्यानंतर माघार प्रक्रिया. त्यानंतर दुपारी ३ वाजता उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. सदर सभेचे पीठासन अधिकारी म्हणून श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी अनिल पवार हे काम पाहणार आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते यासंदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे.