अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका गटातून नगरसेवकांमधून तीन सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. जिल्ह्यात महाआघाडी एकत्र येण्याच्या हालचाली सुरु असतानाच शिवसेनेकडून जिल्हा नियोजनसाठी सर्वाधिक अर्ज घेण्यात आले आहेत. तर भाजपही अर्ज घेण्यात मागे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांची आघाडी होणार की, शिवसेना सरस ठरणार हे अर्ज मागे घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारपर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे एकाच वेळी अर्ज दाखल होऊ शकतात. जिल्हा नियोजन समितीवर निवडणूक द्यायच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात महापालिका गटाच्या ३ जागा, जिल्हा परिषद गटाची १ जागा, तर नगरपालिका गटाच्या एका जागेचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरु झाली असून ४ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद गटातून धनराज शिवाजीराव गाडे ( बारागाव नांदूर गट) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. नगरपालिका गटासाठी पाच जणांनी अर्ज नेले आहेत. त्यात गणेश बाबासाहेब भोस, आसाराम गुलाब खेंडके, शहाजी तुकाराम खेतमाळीस, रमेश झंवर लाढाणे (सर्व श्रीगोंदा, नगरपालिका) व सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी (राहुरी) यांचा समावेश आहे. यातून एकानेही अर्ज दाखल केलेला नाही.
महापालिका गटातून सुभाष लोंढे, अनिल शिंदे, सुप्रिया धनंजय जाधव, मनोज कोतकर, मनोज दुलम, आशा कराळे, सोनाली चितळे. उमेश कवडे, शाम नळकांडे, सुनीता संजय कोतकर, सुवर्णा जाधव या ११ जणांनी अर्ज नेले आहे. दाखल मात्र एकही नाही. गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर शुक्रवारी अर्जाची छाननी, शनिवारी ७ रोजी वैध अर्जाची प्रसिद्धी, अर्ज फेटाळले गेल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा कालावधी दोन दिवस. तर दि. १६ उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख, २४ डिसेंबर मतदान, तर २६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.