केडगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ३१ मार्चनंतर होणार आहेत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या संस्थांच्या निवडणुका निर्धारित वेळेत होणार असून यामध्ये नगर जिल्ह्यातील सहा संस्थांचा समावेश आहे. यात नगर तालुक्यातील सारोळा कासार, बाबुर्डी बेंद या दोन संस्थाच्या निवडणुकांचा समावेश आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना वर्षभरात सहाव्यांदा मुदतवाढ मिळाली. ही मुदतवाढ देताना राज्य शासनाने न्यायालयाने आदेशित केलेल्या संस्थांच्या निवडणुका यातून वगळल्या. त्यामुळे या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला. उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांमध्ये नगर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक, मुळा, ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर हे तीन सहकारी साखर कारखाने आणि १८ सेवा संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ४ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश सरकारने ३० डिसेंबर २०२० रोजी काढले होते. त्यानुसार या संस्थांची निवडणूक प्रक्रिया झाली. यामध्ये तीनही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. जिल्हा बँकेची निवडणूक ही पार पडली. १८ सहकारी सेवा सोसायट्यांपैकी नगर तालुक्यातील वाळुंज सेवा संस्थेची निवडणूक २०२२ मध्ये मंजूर आहे. उर्वरित १७ सेवा संस्थापैकी ११ सेवा संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राहिलेल्या ६ सोसायट्यांपैकी २ सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम २२ फेब्रुवारीला जाहीर झाला असून ४ सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम १ मार्चपासून सुरू होईल.
----
या सेवा संस्थांची होणार निवडणूक..
नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट, शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर या दोन सेवा संस्थांच्या उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू आहे. नगर तालुक्यातील सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव व घोटवी या सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम १ मार्च जाहीर केला जाणार आहे. सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, सुरेगाव, घोटवी या सेवा संस्थांच्या निवडणुका एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.