अहमदनगर : ग्रामपंचायतीची निवडणूक झालेल्या एकूण गावांपैकी ३८० गावांमध्ये आज, मंगळवारी सरपंचांची निवड होणार आहे. उर्वरित गावांमध्ये बुधवारी (दि. १०) सरपंचांच्या निवडी होणार आहेत. अनेक गावांमध्ये आरक्षणावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ५३ गावांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली. ९ गावांमध्ये काही रिक्त पदे असल्याने व काही ठिकाणी अर्ज दाखल न झाल्याने तेथील पदे रिक्त आहेत. त्यामुळे ७५९ ग्रामपंचायतीमध्ये सरंपच निवड प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक तालुक्यात पहिल्या दिवशी निम्म्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवड होणार आहे. त्यानुसार ३८० गावांमध्ये मंगळवारी व राहिलेल्या गावांमध्ये बुधवारी सरपंच निवड प्रक्रिया पाड पाडली जाणार आहे. सरपंच निवडीनंतर उपसरपंचही निवडले जाणार आहेत.
आरक्षण असलेल्या सरपंचपदाच्या निवडीत अनेक ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही चोख व्यवस्था केली आहे. अनेक गावांमधील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले आहेत. संबंधित गावातील सदस्य थेट न्यायालयात गेलेले असल्याने याबाबत नेमकी आकडेवारी कळू शकली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत प्रशासनाकडेही आरक्षणाविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारी संबंधित तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.
---------------
ग्रामपंचायत निवडणूक
निवडणूक जाहीर- ७६७
बिनविरोध- ५३
निवडणूक झाली नाही- ९
सरपंचपदाची निवड- ७५९
-----------