राहुरी : तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. कोरोनामुळे मतदान याद्या अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाहीत. १ जुलैनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीबाबत सभासदांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
तनपुरे कारखान्याची निवडणूक परिवर्तन मंडळाचे खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. या निवडणुकीत विरोधी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे जनसेवा मंडळ निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय सेवानिवृत्त आयुक्त सुभाषचंद्र येवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मंडळाला एकही जागा मिळाली नव्हती. विखे गटाला २३ जागा तर जनसेवा मंडळाला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले होते.
तनपुरे सहकारी साखर कारखान्यात एकूण २३ जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण १८, महिला २, सोसायटी मतदार संघ १, मागासवर्गीय १, इतर मागास १ अशा २३ जागा आहेत. तज्ज्ञ संचालक म्हणून खासदार डॉ. सुजय विखे व स्वीकृत संचालक म्हणून सुभाष वराळे हे काम पाहत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गाडे आणि अशोक खुरद हे जनसेवा मंडळाचे दोनच उमेदवार विजयी झाले होते. तद्नंतर शिवाजीराव गाडे यांचे निधन झाले. ती जागा रिक्त राहिली.
तनपुरे सहकारी साखर कारखान्यात २३ हजारांच्या दरम्यान सभासद आहेत. गेल्या वर्षी तनपुरे कारखाना उसाअभावी बंद होता. यावर्षी कारखाना सुरू करताना संचालक मंडळाची दमछाक झाली होती. सुरुवातीला एक ते दीड महिना साखर कारखाना मशनरीने साथ न दिल्यामुळे बंद होता. मात्र, तनपुरे साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे.
.....
तनपुरे सहकारी साखर कारखान्याची मुदत जुलैमध्ये संपत आहे. अद्याप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनामुळे सध्या काही सांगता येणार नाही. एक एप्रिलनंतर यासंदर्भात सांगता येईल.
- दीपक नागरगोजे,
सहायक निबंधक, राहुरी.
....