केडगाव : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता जिल्ह्यातील ४९ सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी (दि.२२) जाहीर करण्यात झाला आहे. यामध्ये नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट, मदडगाव, बाळेवाडी या तीन संस्थांचा समावेश आहे.
या तीन ही संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार (दि.२२) पासूनच प्रारंभ झाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची मुदत २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी १ मार्च रोजी दुपारी बारापासून निवडणूक कार्यालयात सुरू होणार आहे. वैध असलेल्या उमेदवारी अर्जांची यादी २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २ मार्च ते १६ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत असणार आहे. १७ मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर बाळेवाडी व मदडगाव या सेवा संस्थांसाठी २७ मार्च रोजी तर बाबुर्डी घुमट सेवा संस्थेसाठी २९ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान घेण्यात येणार असून मतदानानंतर लगेचच मतमोजणी करुन निकाल घोषित केला जाणार आहे.