कोपरगाव : शहरातून तालुक्यातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात येणा-या बिरोबा चौकात एका वीज वाहक तारांच्या खांबाला एका डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात चालक, क्लिनर बचावले. मात्र वीज खंडित झाल्याने निम्मा कोपरगाव तालुका अंधारात आहे. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डंपरने वीज खांबाला धडक देताच विजेचे मोठे लोळ जमिनीवर पडले. सुदैवाने डंपर चालक व मदतनीस यांनी उडी मारल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून पूर्व भागातील सर्वच गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्ती सुरू आहे. परंतु आजवर तीन वेळा अशाच प्रकारे समृद्धी महामार्गात डंपरने महावितरणच्या पोलला धडक दिली आहे. त्यात महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु महावितरण प्रशासनाकडून एकदाही समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार अथवा वाहनचालकांवर किंवा वाहनावर कारवाई केली गेली नाही. शनिवारी सोळा तासापासून सर्वत्र वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे बँका, सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा , पतसंस्था, आरोग्य केंद्र यांचे कामकाज ठप्प झाले. एकंदरीत वीज पुरवठा खंडित झाला आहे. तरी सदर ठेकेदार तसेच डंपर चालक-मालक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
डंपरच्या धडकेने वीज वाहक तारा तुटल्या; कोपरगाव तालुक्यातील निम्मे गावे १६ तासांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 5:36 PM