विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जलाशयात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी मच्छिमार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा शिवारात घडली.सुभाष बापू घोलवड (वय ३२) असे या मयत युवकाचे नाव आहे. हा युवक पिंपळगाव पिसा हद्दीत आठाचा मळा शिवारात चौधरी यांच्या विहिरीजवळ मासेमारीसाठी गेला होता. त्याठिकाणी विद्युत वाहिन्या व विद्युत मोटारींचे जाळे तयार झालेले आहे. विसापूर धरण ओव्हरफ्लो होत आल्याने चौधरी यांच्या विहिरीसह काही केबल व विजेचे पोल तर थेट धरणाच्या पाण्यात गेले आहेत. सुभाष घोलवड हा युवक शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ज्यावेळी मासे पकडण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला त्यावेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तो होऊन पाण्यात बुडाला. त्यावेळी धरणाच्या कडेला त्याची लहान दोन मुले व एक मुलगी उभे होते. वडील पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केली. तेथून जवळच रहात असलेल्या मच्छिमार बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत प्रवाह खंडित करुन त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत संतोष शंकर पवार यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक बजरंग गवळी करीत आहेत.
मच्छिमारीसाठी गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:21 PM