श्रीरामपूर : लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कायार्लयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रवीण जमदाडे, श्रीधर कराळे, भरत डेंगळे, यशवंत जेठे, गौतम राऊत, श्रीकांत महाकाळे, दीपक भोकपोडे, महेश नेहुल, दीपक परदेशी, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख, राहुल राऊत, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे शेतकरी, व्यापारी, संघटित व असंघटित कामगार यांचे आर्थिक चक्र थांबलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर वाढीव वीज बिलाचे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नाही, शेती मालाला बाजारपेठेत उठाव नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने वीज बिल माफ करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.