कर्जत : कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी पलंबित विविध वीज प्रश्नासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ‘हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली. हे आंदोलन चार तास चालले. कामे पूर्ण करू, अशी ग्वाही अधिक्षक अभियंता यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.महावितरणकडील ६३ ऐवजी १०० ची रोहित्रे बसवावीत, कर्जत तालुक्यातील इन्फ्रा दोनमध्ये मंजूर झालेली रोहित्र तात्काळ बसवावीत, इतर मंजूर कामे सुरू करावीत, सिंगल फेजची कामे पूर्ण करावीत, कर्जत येथील बापूराव कदम यांच्या बिनशेती प्लॉटमध्ये महावितरणने विना परवाना काम केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. सुरक्षा रक्षक भरतीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. दुरूस्तीची कामे देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी प्रलंबित कामे करावीत यासाठी कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सोमवारी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते याबाबत चौकशी करण्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक होलमुखे यांच्या कार्यालयात गेले असता तेथे अधिकारी उपस्थित नव्हते. इतर कर्मचा-यांनी व्यवस्थित माहिती न दिल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात व कार्यकारी अभियंता यांच्या दालनात हलगी बजाओ आंदोलन केले. हलगीच्या आवाजाने कार्यालयात गर्दी झाली होती. यानंतरकार्यकारी अभियंता यांच्या रिकाम्या खुचीर्ला हार घालून गांधीगिरी केली. सहाय्यक कार्यकारी अभियंता शैलेश जैन यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. अधीक्षक अभियंता बोरसे यांनी आंदोलकांशी दुरधवनीवरून चर्चा केली. आठ दिवसांत तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, अतुल भैलुमे, सचिन धेंडे, किरण भैलुमे, धिरज पवार, सनी वेळेकर, जमीर शेख, लखन भैलुमे, सागर कांबळे, श्रीधर पवार, अनुराग भैलुमे उपस्थित होते.
महावितरणच्या कर्जत येथील कार्यालयात वीज प्रश्नी हलगी बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 5:20 PM