नेवासा : जायकवाडी बॅक वॉटरचा वीजपुरवठा आठ तास करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आज सकाळी १० वाजता नगर- औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे सर्व पक्षीयांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.जायकवाडी बॅकवॉटरचा वीजपुरवठा आठ तास करा. असे न झाल्यास आम्ही शेतक-यांसह सर्वपक्षीयांना बरोबर घेऊ पेटून उठू तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी बोलतांना दिला. यावेळी झालेल्या रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व विठ्ठलराव लंघे यांनी केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, कॉ.बाबा आरगडे, अंबादास कोरडे, दादासाहेब गंडाळ, अशोक ढगे, दादासाहेब चिमणे, संतोष गव्हाणे, राजेंद्र मते यांनी भाषणाद्वारे सरकारवर चौफेर हल्ला चढवून आठ तास पूर्ण दाबाने विजेची मागणी केली. अर्धा तास सुरू असलेल्या रास्तारोको प्रसंगी निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगर - औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम येथील रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा यावेळी लागल्या होत्या.