अहमदनगर : एक सहकारी आणि सहव्यवसायी म्हणून ना़स़ फरांदे सरांचा १९७८ पासून ते त्यांच्या शेवटपर्यंत मला सहवास लाभला़ सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या ओझर्डे या गावात प्रा़ ना़स़ फरांदे सरांचा जन्म झाला, घरची परिस्थिती तशी बेताचीच़ त्यांचे प्राथमिक शिक्षण, ओझर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई व साखरवाडी, (ता.फलटण) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर कॉलेज- सोलापूर (बी.ए.) दयानंद कॉलेज, सोलापूर (एम.ए.मराठी), पुणे व शिवाजी विद्यापीठात मराठी विषयात प्रथम श्रेणीत येऊन विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविले़ शिक्षण पूर्ण झाल्यावर फरांदे सर नोकरीनिमित्त १९६५ ते १९७१ पर्यंत धुळे येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़ त्यानंतर १९७१ ते १९८६ पर्यंत कोपरगाव येथील माजी आमदार कै.के.बी. रोहमारे यांच्या के.जे. सोमैया महाविद्यालयात त्यांनी विद्यादानाचे काम केले. कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी नंदराम बोरावके यांची कन्या मंगल यांच्याशी त्यांचा विवाह ७ मार्च १९६७ रोजी झाला. बोरावके परिवाराच्या सोमैया कॉलेज संचालक प्रभाकरराव बोरावके यांच्या आग्रहाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे माजी आमदार यांनी त्यांना १९७१ मध्ये आपल्या महाविद्यालयात रूजू करून घेतले आणि सोमैया महाविद्यालयाच्या कोंदणात एका सरस्वती पुत्रास विराजमान केले़ फरांदे सरांनी कोपरगाव आपली कर्मभूमी करून साहित्य संमेलन भरवून शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्व जुन्या नव्या साहित्यिकांना एकाच व्यासपीठावर आणले आणि येथूनच सरांच्या गरूडझेपेला सुरुवात झाली. संस्थेचे कै.भि.ग. रोहमारे वादविवाद करंडक स्पर्धेचे आयोजन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ना.स.फरांदे यांच्याकडे दिले. यामुळे संपूर्ण महाराष्टÑातील विद्यार्थी वर्गाला सरांच्या ज्ञानाचा परिसस्पर्श लाभला. खरे तर कोपरगाव सरांची सासूरवाडी व कोपरगावचे जावई म्हणून त्यांचा मान व लौकिक त्यांच्या कर्तृत्वाने झळाळून निघाला.सरांच्या कर्तृत्वाला खरी कलाटणी १९७५ च्या आणीबाणीमुळेच आणि लोकनायक कै.जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणी विरोधात घडवून आणलेल्या क्रांतीमुळे मिळाली. त्यावेळी कै.सूर्यभान पा. वहाडणे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन तत्कालीन काँग्रेस पक्ष सरकार व इंदिरा गांधी यांच्या विरोधात मोर्चा काढला असताना त्यांनी त्यांचे समर्थन केले़ आणीबाणी संपल्यावर जनता पक्ष स्थापनेनंतर जनता पक्षाच्या कार्यात व प्रचार सभांना कै. सूर्यभान वहाडणे यांच्यासोबत राहाता आले व सन १९८० मध्ये भा.ज.पक्षाची स्थापना झाल्यावर ते अधिक सक्रिय राजकारणात झोकून काम करू लागले़ त्यांच्यातील ओजस्वी वक्तृत्व कला व भाषणाला प्रभावित होऊन कै.सूर्यभान वहाडणे यांनी त्यांना भारतीय जनता पक्षात येण्याची विनंती केली आणि एक नवीन पक्षाच्या मुख्य पदावर म्हणजे तालुका, शहर, जिल्हा स्तरावर पक्षाचे अध्यक्ष पदाची धुरा व भगवा झेंडा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलून, कै. राजाभाऊ झरकर, शेठ शांतीलालजी जाजू, कोपरगावी सन १९६५ साली जनसंघाची स्थापना करणारे शेठ टेकचंदजी खुबानी, कै.आण्णा बागूल, रामदासजी खैरे, बडदे बंधू, तात्या बोरावके, रामदासजी बोरावके अशा सर्व मातब्बरांना सोबत घेऊन व कै. सूर्यभान वहाडणे यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे काम पूर्ण जोरात सुरू केले. त्यांच्या शिरपेचात एक-एक मानाचा तुरा खोवला जाऊ लागला आणि नगर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर एक तारा विराजमान झाला. भाजपाचे काम करत असताना विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षातील, विखे, काळे, गडाख, कोल्हे, थोरात, तनपुरे, घुले, राजळे इत्यादी राजकारण्यांसोबत त्यांनी अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. ..त्याच कालावधीत राजकारणातील पकड पाहून १९८६ मध्ये पक्षाने त्यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली व त्या संधीचे सोने करून त्यांनी, प्रथम क्रमांकाची मते मिळवून विजय संपादन केला होता. राजकारणात श्रेष्ठ व ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ते नेहमी बाळासाहेब भारदे यांचा उल्लेख करीत असत. शैक्षणिक, साहित्यिक कार्य- पुणे विद्यापीठात मराठी अभ्यास मंडळ व कला विद्या शाखेचे तीन वर्ष सदस्य म्हणून फरांदे सर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली़ अनेक चांगल्या साहित्यिकांचे समाज प्रबोधन करणारे साहित्य शालेय-विद्यापीठीय शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमात आणावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केला. कोपरगाव येथील शारदा एज्युकेशनचे अनेक वर्षे ते सदस्य होते. साहित्य रसिक मंडळ, नाट्यरंग या संस्थांचे संस्थापक- सदस्य म्हणून भरीव कामगिरी व मदत केली.सन १९८१ मध्ये अहमदनगर जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते़ या संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. मराठी अन्याय निर्मूलन परिषदेचे संस्थापक पदाधिकारी होते. नगर येथील सन १९९७ मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सलग आठ वर्षे सदस्यपद भूषविले होते. श्री.साईबाबा संस्थान शिर्डी येथे सन १९८९ ते १९९४ पर्यंत विश्वस्त म्हणून कामगिरी करताना शिर्डी परिसरातील शैक्षणिक संस्थांना मुलांच्या शिक्षणासाठी इमारत, शालेय साहित्याची भरघोस मदत करण्याचा शिरस्ता त्यांनी घालून दिला होता. सन १९७८-१९८३ या कालावधीत कै.शंकरराव काळे यांनी त्यांना साखर कारखान्यावर निमंत्रक मंडळाचे पाच वर्षे सचिव म्हणून संधी दिली. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीवर शिक्षण तज्ज्ञ व सदस्य म्हणून १० वर्षे कार्यरत होते़ महाराष्टÑात महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना स्थापन करून प्राध्यापकांवर होणाºया जाचक त्रासातून बाहेर काढण्यासाठी (पुक्टो) संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली़ शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरावरील सेवकांना अभयदान प्राप्त झाले़ त्याच वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. ना़ स़ फरांदे सर यांनी सन १९७२ ते १९७७ पर्यंत राजकारणाचे अभ्यासक व निरीक्षक म्हणून काम केले. आणीबाणीनंतर जनता पक्षात सक्रिय झाले़ या काळात पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष या पदांवर काम केले़ तद्नंतर जनता पक्षाचे विघटन होऊन, पूर्वाश्रमीचा जनसंघ हा भारतीय जनता पक्ष नावाने उदयास आला आणि सन १९८०-१९८७ या काळात फरांदे सर भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाले़ पुढे पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तर राष्टÑीय परिषद सदस्यपदी शेवटपर्यंत कार्यरत होते़ पक्षाने त्यांना १९८६ मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत पाठविले. तद्नंतर ते सलग १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते़ तसेच १९९१ ते १९९४ भाजपाचे प्रांताध्यक्ष झाले़ या काळात त्यांनी महाराष्टÑात पक्षाचा प्रचार व प्रसार केला़ सरांनी शिक्षण, शेती, जल संधारण व नद्याजोड प्रकल्पाबाबत प्रा.महादेव शिवणकर यांचे पाटबंधारे मंत्री काळात अभ्यासपूर्ण ब्लू प्रिंट करून, केंद्रात वाजपेयी सरकारला सादर केली होती.१९८४ मध्ये विधान परिषदेत उपसभापती निवड होताच सरांनी प्रांताध्यक्ष पदाचा राजीनामा दिला़ १९९० मध्ये त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली़ १९८८ मध्ये फरांदे सर यांची विधानपरिषदेच्या सभापती या उच्चतम पदावर निवड झाली़राजकारणात स्थिरावल्यावर शासनाच्या ध्येय धोरणानुसार त्यांना विदेश दौरे करण्याची संधी मिळाली. आपल्या १८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी कोलंबो प्लॅन-अंतर्गत पहिला श्रीलंका दौरा केला व नंतर राष्टÑकुल संसदीय मंडळाच्या परिषदेस ब्रिटनचा दौरा केला़ फ्रान्स (पॅरीस), स्वित्झर्लंड (जिनिव्हा) येथे अभ्यास दौरा, १९९६ ला ईस्त्राईलमध्ये जेरूसलेम इथे जागतिक मराठी साहित्य परिषदेत उपस्थित राहून तेथे मराठी भाषिकांना मराठी भाषेचे उत्कृष्ट व्याख्यान दिले़ कृषी-पद्धत, केंद्रांना भेटी, इजिप्तमध्ये कैरो येथे अभ्यास दौरा, १९९७ मध्ये संयुक्त राष्टÑ अमेरिकेत बोस्टन या ठिकाणी जागतिक मराठी चेंबर आॅफ कॉमर्सने आयोजित केलेल्या उद्योग परिषदेस सहभाग व भारतात उद्योगात एन.आर.आय. मंडळीच्या सहभागाचे साकडे घातले होते. त्याचवेळी मराठी भाषिकांच्या संमेलनात प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते़ याच १५ दिवसाच्या कालावधीत, न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, फ्लोरिडा इत्यादी ठिकाणी आपल्या अमोघ वाणीने या सरस्वती पुत्राने सर्व मराठी भाषिक, भारतीयांना मंत्रमुग्ध केले होते़ संवैधानिक कायद्याचा अलिखित ब्रिटनच्या संविधांनाचा अभ्यासही केला होता. १९९८ मध्ये युरोप मराठी परिषदेसाठी हॉलंड व लायसर्न (स्विर्त्झलँड) येथे फ्लॉरेन्स व रोम (इटली) इन्सबुक (आॅस्ट्रीया), म्युनिच (जर्मनी), अॅम्सटरडॅम (नार्वे) स्विडन या ठिकाणी युरोपमधील अभ्यास दौरे पूर्ण केले.मी व फरांदे आम्ही एकाच महाविद्यालयात एकाच विचाराचे मित्र-कार्यकर्ते म्हणून जवळजवळ १९७८-२०१८ पर्यंत एकत्र राहिलो. मध्ये काही काळ मी त्यांचे स्विय सचिव म्हणूनही काम केले. त्यांच्या रूपाने मोठ्या मनाची, दिलदार, सदैव जनतेच्या कामाचा ध्यास असणारी व्यक्ती मी अत्यंत जवळून पाहिली. त्यांनी राजकारणाचे धडेही दिलेत व राजकीय कामात प्रोत्साहित केले होते़ तसे पक्षाच्या आदेशावरून नगर लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यावर ते थोडे थांबले़ वेट अॅण्ड वॉच या उक्तीप्रमाणे राजकारणात वावरत असताना मधुमेहाच्या व्याधीने त्यांना पोखरले होते़ अशा महान अभ्यासकाचे अखेर १६ जानेवारी २०१८ मध्ये निधन झाले अन् हजारो कार्यकर्त्यांना ते पोरके करून गेले़
लेखक - प्रा.सुभाषचंद्र शिंदे (सेवानिवृत्त प्राध्याक, सोमय्या महाविद्यालय)