श्रीगोंदा : सात गावांना वरदान ठरलेली कुकडी प्रकल्पातील डीवाय बारा वितरिकेची दुरुस्ती माझा कालवा माझी जबाबदारी या अभियानातून करण्यात आली. त्यामुळे तब्बल अकरा वर्षांनंतर कुकडीचे पाणी टेलकडील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
तांदळी, आढळगाव, देऊळगाव, घुगल वडगाव, घोडेगाव, श्रीगोंदा, भिंगाण या सात गावांना वरदान ठरत असलेल्या डीवाय बारा चारीची (वितरिका) लांबी १५ किलोमीटर आहे. त्यामुळे वितरिकेवरील १ हजार ९६६ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली आहे. मात्र ही वितरिका नादुरुस्त झाल्याने श्रीगोंदा, घोडेगाव, भिंगाणकडील शेतकऱ्यांना अकरा वर्षांपासून पाणीच मिळत नव्हते. त्यामुळे ‘टेल’कडील शेतकरी हतबल झाले होते.
या प्रश्नात कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी लक्ष घातले. माझा कालवा माझी जबाबदारी या अभियानातून डीवाय १२ चारीची यांत्रिकी विभागाच्या मदतीने दुरुस्ती केली. ही दुरुस्ती करण्यासाठी उपअभियंता अविनाश फडतरे व शाखा अभियंता शशिकांत माने यांनी लक्ष दिले. पंधरा दिवसात चारी चकाचक करण्यात आली.
कुकडीचे आवर्तन सुटले आणि टेलला पाणी जाते की नाही याची चाचणी घेण्यात आली. पाणी थेट भिंगाण शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले.
----
कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व त्यांच्या टीमने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून डीवाय बारा चारीची दुरुस्ती केली. भिंगाणला ११ वर्षांनंतर पाणी आले. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. कुकडीच्या अधिकाऱ्यांचे आभार.
-नानासाहेब शिंदे,
तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
फोटो दोन : १५ कुकडी, १
डीवाय १२ चारीतून वाहणारे पाणी. दुसऱ्या छायाचित्रात कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांचा सत्कार करताना लाभक्षेत्रातील शेतकरी.