परळी पीपल्स अर्बनच्या श्रीरामपूर शाखेत ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. या रकमेपैकी संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष व सध्या अध्यक्ष असलेले नितीन सुभाष घुगे, जनरल मॅनेजर विश्वजित राजेसाहेब ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश शिवकुमार मानूरकर व संचालिका निमीषा प्रमोद खेडेकर यांचे पती प्रमोद किसन खेडेकर यांनी संबंधित शाखाधिकारी व कॅशिअर यांच्याशी संगनमत करून पैशांचा अपहार केला. लेखापरीक्षणात हा अपहार चव्हाट्यावर आला. त्यानंतर संजय दत्तात्रय शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार मोठ्या रकमेचा व तपास क्लिष्ट असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
इतर शाखेतील गुंतवणूकदारांनी सतर्क व्हावे
परळी पीपल्स अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नगर जिल्ह्यातील नेवासा, तिसगाव, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी येथेही शाखा होत्या. या शाखांमध्येसुद्धा ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. ठेवीची मुदत पूर्ण होऊनही ज्यांना पैसे परत मिळालेली नाहीत तसेच ठेव ठेवलेली शाखा बंद पडलेली आहे. अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा तसेच ठेवीची परतफेड मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना अर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून घेऊन तो अर्ज १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ पर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.