संदीप घावटेलोकमत न्यूज नेटवर्कदेवदैठण (जि. अहमदनगर) : सहाजणांचे कुटुंब, केवळ दीड एकर शेती त्यातच गेल्या १५ वर्षांपासून अर्धांगवायूने वडील अंथरुणावर खिळलेले, अशा परिस्थितीत चरितार्थाबरोबरच शिक्षण आणि वडिलांचे औषधोपचार यासाठी लागणाऱ्या पैशासाठी तिघी बहिणींची देशभर धावपळ सुरु आहे. धावण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून मुलींनी आजपर्यंत वडिलांवर उपचार केले आहेत. अळकुटी (ता. पारनेर) येथील भंडारी कुटुंबातील शीतल, भाग्यश्री आणि साक्षी या तीन मुलींची ही प्रेरणादायी कथा आहे.
तिघी बहिणी शिक्षणाबरोबरच धावण्याचा कठोर सराव करतात. सोबतच शेतीकाम, घरकाम व वडिलांची सेवाशुश्रृषा करतात. आई मोलमजुरी करते, तर नववीत शिकणारा भाऊ बहिणींना सरावाला वेळ मिळावा म्हणून आईला मदत करतो. तिघीही सुटीच्या दिवशी शेतात रोजंदारीवर कामाला जाऊन वडिलांच्या औषधांसह विविध स्पर्धेला जाण्यासाठी पैसे जमवितात. सगळ्यांत मोठी शीतल बी. ए.च्या शेवटच्या वर्षात, तर भाग्यश्री प्रथम वर्षाला आणि साक्षी दहावीत शिकत आहे. या तिघी प्रशिक्षक श्रीरामसेतू आवारी, दिनेश भालेराव, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणापासून सराव करतात.
देशभरातील मैदानांवर तिघींचाही दबदबा....शीतलने वरंगळ (तेलंगणा) राष्ट्रीय क्राॅस कंट्री स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. भुवनेश्वर ओरिसा येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुल मॅरेथाॅन ४२ कि.मी. व मंगलोर कर्नाटक येथे बक्षिसे मिळवून मॅरेथॉन, क्रॉस कंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या.सांगली, नागपूर येथील राज्यस्तर क्रॉसकंट्री स्पर्धा, महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मुंबई मॅरेथॉन १६ कि.मी.मध्ये तिसरा क्रमांक. हिरानंदानी हाफ मॅरेथॉन ठाणे स्पर्धेत तिसरा क्रमांक, निर्भया मॅरेथॉन नाशिक पोलीस स्पर्धेत दुसरा क्रमांक, टाटा अल्ट्रा हिल मॅरेथॉन लोणावळा स्पर्धेत प्रथम क्रमांक असे घवघवीत यश मिळविले.
भाग्यश्रीनेही शीतलच्या पावलावर पाऊल ठेवत संगरूर - पटियाला, पंजाब येथील राष्ट्रीय स्पर्धा, नागालँड येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. तर राज्यातही विविध राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत दबदबा निर्माण केला. साक्षीनेही तिरूपती येथील सब-ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात ६०० मीटर धावण्यात देशात सातवा क्रमांक व चंदीगढ (पंजाब)) येथील ५५वी राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत २ कि.मी. स्पर्धेत देशात चौथा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. पुणे-फुलगाव व सांगली येथील राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.