आकाश येवले
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी उद्योजक बनविण्यावर भर राहील. शेतकऱ्यांना शिक्षणाची अट न ठेवता त्यांना प्रशिक्षण देऊन पिकांचे उत्पादन कसे वाढवता येईल, यावर भर दिला जाईल, असे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. पाटील यांची नुकतीच कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘लोकमत’ने गुरुवारी संवाद साधला.
शेतकऱ्यांना कोणकोणत्या विषयांचे प्रशिक्षण देणार?
डाॅ. पाटील - शिक्षण, संशोधन व प्रसारण यावर भर देताना शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील समन्वय साधण्यावर भर दिला जाईल. शिकलेले युवक आता अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. शेळीपालन, गायपालन, मच्छीपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन असे शेतीला पूरक जोडधंदे अधिक प्रमाणात उभे करावे लागणार आहेत. शेतीतून उत्पादन वाढवून दोन पैसे मिळाले तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्या दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल?
डॉ. पाटील - एकाच पद्धतीच्या पिकावर अवलंबून न राहता, बहुपीक पद्धतीवर भर देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यास आत्मविश्वास वाढेल. त्यातून उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. वारंवार उसाचे पाचट जाळले जाते. त्यावर पाचटाचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. उसाला अडीच हजार रुपये टन तर पाचटाला सहा हजार रुपये टन इतका भाव आहे. त्याचा वापर शेतात अच्छादनासाठी केला जातो. पाचट जाळून न टाकता कुटी करावी किंवा पाचट गाडून जमिनीची ताकद वाढवावी. पाचट काढल्याने पिकात सुधारणा होऊन उत्पादन वाढते, हे पटवून देण्याचे काम भविष्यात विद्यापीठाला करावे लागणार आहे.
पीक उत्पादन वाढ आणि मालाच्या विक्री विषयी शेतकऱ्यांना काय सांगणार?
डॉ. पाटील - शेतकऱ्यांना पीक कसे पिकवायचे माहिती आहे. परंतु, विकायचे कसे हे माहिती नाही. त्यांना पिकवलेल्या मालाला विकायचे कसे, हेच सांगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना फक्त पाणी वाचवा, हे सांगून चालणार नाही. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन कसे वाढते, ठिबकच्या तंत्रज्ञानाच्या वापर कसा करावा, हे काम पुढील काळात विद्यापीठाला करायचे आहे. मातीची सुपिकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचे प्रमाण वाढवावे लागेल.
हवामानात रोज बदल होतात. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. यासाठी उपाययोजना काय?
डॉ. पाटील - आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले जाईल. त्याला अनुसरून बदल करावे लागणार आहेत. ज्या हवामानात एखादे पीक येते, ते अगोदर घेतले पाहिजे. जेणेकरून त्या पिकाला भाव जास्त कसा मिळेल, त्या दृष्टिकोनातून इथून पुढे प्रयत्न करावे लागणार आहेत.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता आहे काय?
डॉ. पाटील - कृषी विद्यापीठातील रिक्त जागांविषयी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनुष्यबळ जरी कमी असले, तरी मार्ग काढून शिक्षण संशोधन आणि विस्तार याकडे लक्ष दिले जाईल. सर्वांच्या सहकार्याने तळागाळापर्यंत विद्यापीठाचे संशोधन कसे जाईल, त्या दृष्टिकोनातून कामे केली जातील.