राहुरी : तालुक्यातील बारागाव नांदूर गावातील मातीमिश्रित वाळू लिलावाच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश देताच पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, मातीमिश्रित वाळू लिलाव संपल्यानंतरही चोरीची वाळू वाहतूक सुरूच आहे. मातीमिश्रित लिलावासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांना नवीन रस्ता मिळाला आहे.
बारागाव नांदूर गावातील नुकत्याच झालेल्या मातीमिश्रित वाळू लिलावाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गावातील अंतर्गत रस्त्यांसह बारागाव नांदूर ते राहुरी, कुरणवाडी, बोरटेक या रस्त्यांवर हायवा डंपरने वाळू वाहतूक करण्यात आली. ग्रामस्थांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार मातीमिश्रित वाळू लिलाव हा मुळा नदी पात्रालगतच्या शेती क्षेत्रात देण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठीच लिलाव होत असल्याने ठेकेदाराने जेसीबी व पोकलॅनच्या साह्याने नदीपात्रातून वाळू उपसा करून ते शेती क्षेत्रात आणत. रात्रभर नदीतून वाळू उपसा करायचा व दिवसभर शेतात जमा केलेल्या वाळू साठ्याची वाहतूक करायची. जमीन धारकांना ही डंपरमागे २ ते ५ हजार रूपयांची अदा केली जात होते. यामुळे अनेकदा वाद होत आहेत. यामुळे महसूल प्रशासनानेच मुदतीपूर्वीच वाळू उपसा थांबविण्याचे आदेश दिले होते.
वाळू वाहतुकीमुळे गावातील अंतर्गत रस्ते खराब होऊन ५ ठिकाणावरील अंतर्गत गटारीचे चेंबर फुटले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. याचा ग्रामस्थांना त्रास होत आहे. वाळू उपशाकडे प्रशासन मात्र अजूनही डोळेझाक करीत आहे.
...
ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची माहिती द्यावी
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बारागाव नांदूर लिलावाच्या चौकशीसाठी सीसीटीव्ही तपासणीचे आदेश दिले. बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात वाळू वाहतूक करणारे डंपर, त्यामधील भरलेली वाळू व किती वाळू उपसा करण्यात आला याची सविस्तर माहिती मिळेल. त्यामुळे ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सर्व माहिती जिल्हाधिकारी भोसले यांना द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडे यांनी केली आहे.