तालुक्यात यंदा कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असतानाही केवळ बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा साठवणुकीचा पर्याय शोधला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन राहाता तालुक्यात झालेले प्रथमदर्शनी दिसत आहे. यावर्षी तालुक्यात २५०० एकर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली होती. मागील वर्षी कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे. त्याच भावात विकला जात होता, तेव्हा पुढे भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर महिन्यापर्यंत कांद्याची साठवणूक ठेवली. परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. नंतर हा कांदा शेतकऱ्यांना चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवार पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु सध्या पाहिजे तसा भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरून ठेवण्याची तयारी केली आहे.
कांद्याला मिळत असलेल्या सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटल बाजारभावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या तालुक्यातील प्रवराकाठ आणि गोदाकाठ परिसरात शेतकरी कांदा साठवणूक करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.
..............
कांद्याला उत्पादन १५ ते १७ हजार रुपये एकरी खर्च येतो आणि सध्या कांदा बाजारभाव ८०० ते ११००च्या दरम्यान असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा साठवणुकीवर भर दिला जात आहे.
- विनायक दत्तात्रय देठे, शेतकरी, अस्तगांव
...............
यावर्षी कांदा पिकास पोषक वातावरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे, पण सध्या कांद्यास सरासरी सातशे ते हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कायमस्वरूपी केलेल्या चाळीमध्ये तर अनेक ठिकाणी तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठविण्याची तयारी केलेली आहे.
- नारायणराव लोळगे, कृषी पर्यवेक्षण अधिकारी, राहाता