अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच वाहने लावावी लागत असल्याने सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत वाहने आतमध्ये घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय परिसरात दररोज नातेवाइकांसह वाहनांचीही मोठी गर्दी होत होती. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीनुसार पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या आत वाहने नेण्यास व गर्दी करण्यास बंदी केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या वाहनांनाही बंदी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच वाहने उभी करावी लागत असल्याने वाहने चोरीला जात असून दंडात्मक कारवाई होत आहे. अशी तक्रार करत सोमवारी सकाळीच कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी वाहनांना आतमध्ये प्रवेश देण्याची मागणी केली. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी आंदोलकांची समजूत घालत या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असे सांगितले. आमचे काम बंद आंदोलन नाही; मात्र आम्हाला रुग्णालयाच्या आत वाहने नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी केली.
ओळी- जिल्हा रुग्णालयात वाहन नेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
फोटो- मेल केला