अहमदनगर : सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापौर सुरेखा कदम यांना रिकामे हंडे देत अनोखे आंदोलन केले. महापौर यांनी या आंदोलनाची दाखल घेत प्रभाग सातमधील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सुचना अधिका-यांना केल्या.सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सातमधील रावसाहेब पटवर्धन स्मारक परिसर, भाग्योदय गृहनिर्माण सोसायटी व परिसरातील नागरिकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. काही नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. या प्रभागातील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ४० वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. आता ही पाइपलाइन ठिकठिकाणी फुटत असून, त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते़ तसेच बरेच पाणी वाया जाते़ त्यामुळे नवीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याची मागणी नगरसेविका मनिषा बारस्कर यांनी केली.महापौर सुरेखा कदम यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख महादेव काकडे यांना बोलावून प्रभाग क्र. ७ मधील पाण्याचा प्रश्न तातडीने कसा सोडविण्याच्या सुचना दिल्या. याप्रसंगी उर्मिला काकड, हेमंत पत्की, माधुरी क्षीरसागर, माणिक कोटस्थाने, कुसूम मंत्री, विनय क्षिरसागर, प्रदीप गीते, हेमलता गिते, विप्रदास नंदकिशोर, प्रियंका सरनाईक, धनश्री पागिरे आदी महिला उपस्थित होत्या.
अहमदनगर महापालिकेच्या महापौरांना दिले रिकामे हंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 3:48 PM