अहमदनगर : खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. यावेळी खासदार गांधी यांचे पुत्र तथा नगरसेवक सुवेंद्र गांधी उपस्थित होते.खा. गांधी यांचे धार्मिक परीक्षा बोर्डाजवळ (आयटीआय कॉलेज परिसर) बंगला आहे. या बंगल्याचे रस्त्यामध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. त्यांची ही तक्रार अनेक वर्षांपासून आहे.
मात्र राजकीय दबावाखाली महापालिकेने आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले. खा. गांधी यांचे समर्थक असलेला पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. तेंव्हापासून खा. गांधी हे सर्वांचेच टीकेचे लक्ष्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेही खा. गांधी यांच्या बंगल्याची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून खा. गांधी यांचे समर्थक असलेला उपमहापौर छिंदम याचा महापौरांच्या निर्णयांना नेहमीच विरोध व्हायचा. आता छिंदम बडतर्फ झाल्यानंतर शिवसेनेच्या आदेशानेच खा. गांधी यांच्या बंगल्याच्या मोजणीचे फर्मान निघाल्याची चर्चा आहे. महापालिकेचे नगररचनाकार संतोष धोंगडे यांच्या पथकाने मोजणी केली.