लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : दोन दिवसांपासून बंद असलेली शहर बस सेवा अखेर आज बुधवारी पहाटेपासून सुरू झाली. मंगळवारी दिवसभर झालेल्या चर्चेच्या फे-यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिकर्ता संस्थेने बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. एक महिन्यात किमान २५ ते ३० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर अभिकर्ता संस्थेने सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली.महापालिकेची शहर बस सेवा यशवंत अॅटो यांच्यामार्फत चालविली जाते. कराराप्रमाणे बस सुरू राहाव्यात आणि नुकसान झाले तरी बस सेवेत खंड पडणार नाही, यासाठी महापालिका दरमहा संस्थेला पाच लाख रुपयांचे अनुदान (नुकसान भरपाई) देते. मात्र दीड वर्षांपासूनचे ८० लाख रुपये थकल्याने आणि सेवेतील अडथळे दूर करण्यात अपयश आल्याने यशवंत अॅटोचे संचालक धनंजय गाडे यांनी पूर्वसूचनेप्रमाणे सोमवारी (दि.१२) सकाळपासून बस सेवा बंद केली. ऐन परीक्षेच्या काळात बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे दोन दिवसांपासून मोठे हाल झाले. तर महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही त्रास सहन करावा लागला.बुधवारी सकाळपासून यशवंत अॅटोचे धनंजय गाडे आणि महापालिका यांच्यात बैठका सुरू होत्या. महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, आयुक्त घनश्याम मंगळे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन जाधव, सागर बोरुडे, योगिराज गाडे, मुदस्सर शेख, नितीन बारस्कर, दिगंबर ढवण, दत्ता मुद्गल, हनुमंत भूतकर, काका शेळके, अभियंता परिमल निकम उपस्थित होते.या बैठकीनंतर महापौर कदम म्हणाल्या, शहर बस सेवा सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. अभिकर्ता संस्थेच्या अडचणी आणि थकीत रक्कमेबाबत तोडगा काढण्यात आला. महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे थकीत रक्कम सध्या देणे शक्य नाही. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी बस सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती गाडे यांना केली. याबाबींचा विचार करून त्यांनी बस सेवा सुरू करण्याबाबत सांगितले.
- महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचा विचार करून बस सेवा बुधवारी (दि.१४)पहाटेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. थकीत अनुदानापैकी २५ ते ३० लाख रुपये महिनाभरात देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. याशिवाय वाहनतळ आणि इतर अडचणी सोडविण्याबाबत प्राधान्याने लक्ष देण्याबाबत आश्वासन मिळाले. त्यामुळे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
- -धनंजय गाडे, संचालक, यशवंत अॅटो