अहमदनगर : पत्रकार बाळ ज बोठे याच्यापासून आमच्या कुटंबियांच्या जिविताला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे यांनी केली आहे. याबात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी निवेदन दिले आहे. या निवेदनात रुणाल जरे यांनी म्हटले आहे की, बोठे याचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. तो माझ्या आईला नेहमी जिवे मारण्याची धमकी द्यायचा. तुला नाही तर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही असेही तो बोलायचा. आमच्या कुटंबियांवर बोठे याची मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कुणीच त्याच्या विरोधात बोलत नव्हतो. माझ्या आईने त्याच्या विरोधात या आधी कोतवाली पोलीस ठाण्यात अर्जही दिले आहे. बोठे याच्यापासून आमच्या जिविताला धोका असल्याने आम्हाला तातडीने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयामाला माने यांनीही सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे तर जरे यांच्या कुटुंबियांनीही संरक्षणाची मागणी केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
बोठे याच्यापासून जरे कुटुंबियांना धोका; मागितले पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:34 PM