भाऊसाहेब येवले । राहुरी : लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झालेल्या राहुरी येथील ग्रंथप्रेमी सुरेश हराळ यांनी लहानपणापासून गावोगावी वाचन संस्कृती निर्माण केली आहे. सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके आहेत. नाट्यक्षेत्रात रूची असलेल्या सुरेश हराळ यांनी नाटकात अभिनय करताना अनेक मित्र जोडले आहेत.राज्य शासनाचा ग्रंथमित्र हा पुरस्कार प्राप्त झालेल्या सुरेश हराळ यांना नववीत असताना वाचनाची आवड निर्माण झाली. कॅनल इन्सपॉक्टर म्हणून कार्यरत असलेले वडील बाबूराव हराळ यांनी सुरेश यांना दिल्ली येथील बुक क्लबचे सदस्य केले. दरमहा तीन चार हिंदी पुस्तके पोस्टाने मिळत असते़ गुलजार, सत्यजित रे, प्रेमचंद, रविंद्रनाथ टागोर प्रथितयश हिंदी लेखकांची पुस्तक वाचनाची संधी मिळाली. त्यातून सुरेश हराळ यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. वाचनातून वाचनालय सुरू करण्याची संधी मिळाली. त्यातून १९७२ मध्ये वि़. दा़. सावरकर वाचनालय सुरू केले.ग्रामीण भागात वाचनालय संस्कृती वाढावी म्हणून सायकलवरून रपेट मारून राहुरीसह मुळानगर, राहुरी फॅक्टरी, विद्यापीठ आदी ठिकाणी घरोघरी जाऊन पुस्तके वाचण्यास उपलब्ध करून दिली. १९७७ मध्ये लातूर येथे ग्रंथपाल क ोर्स सुरू केला. १९७९ मध्ये ग्रंथपाल म्हणून विद्या मंदिर प्रशालेमध्ये नोकरी स्वीकारली़. १९८४ मध्ये जिजामाता ग्रंथालयाची उभारणी केली़. आज या ग्रंथालयात पंधरा हजार पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविण्याचे काम सुरेश हराळ यांनी केले. अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघात सदस्य म्हणून सुरेश हराळ यांची निवड झाली़. ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे यांच्याबरोबर जिल्ह्यात शेकडो वाचनालयांना मार्गदर्शन केले. वाचनालय कसे सुरू करायचे, वाचक संख्या कशी वाढवयाची, रजिस्टेशन कसे करायचे, अनुदान आदी बाबत सुरेश हराळ यांनी माहिती उपलब्ध करून देत मार्गदर्शन केले. वाचन संस्कृती वाढावी म्हणून रवींद्र भट, डॉ़ किशोर काळे, मेघा कुलकर्णी, बाबा भांड, ह़. मो. मराठे यांना बोलावून वाचकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली.ग्रंथमित्र सुरेश हराळ यांची भूक केवळ वाचकांपुरती मर्यादित राहिली नाही. नाटकात भाग घेऊन विचारपीठ उपलब्ध करून दिले. सदाशिव अमरापुरकर, सविता प्रभुणे, लिला गांधी कलाकारांना राहुरीला बोलाविले. मी सावित्रीबाई बोलते या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग राहुरीला आयोजित केला होता. वाचन चळवळीची दखल घेऊन राज्य शासनाने सुरेश हराळ यांना ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरव केला. ग्रंथमित्र हराळ यांनी पुस्तक पे्रमामुळे स्वत:चे घरात ग्रंथालय साकारले आहे. अनेक दुर्मिळ पुस्तके संग्रही आहेत. वाचनातून पे्ररणा मिळत गेली़ त्यातून व्यक्तिमत्त्व फुलत गेले. सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती जतन करण्याचे काम हराळ करीत आहेत.
गावोगावी वाचन संस्कृती वाढविलेला ग्रंथप्रेमी; दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 1:22 PM