जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट आली. एप्रिलमध्ये पूर्ण महिनाभर सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ३५०० होती. शेवटच्या आठवड्यात व मेच्या पहिल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या साडेचार हजार पार गेली होती. एकट्या एप्रिल महिन्यात आठशेच्यावर मृत्यू झाले होते. अमरधाम स्मशानभूमीत एका दिवशी ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर २० जणांच्या मृत्यूची नोंद होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस ४० ते ४५ जणांवर रोज अंत्यसंस्कार झालेले असताना पोर्टलवर मात्र १० ते १५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. सध्या रोज २२ ते २५ जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. पोर्टलवर मात्र सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही नोंद नंतर चार दिवसांनी केली जात असल्याचे दिसते आहे.
--------------
ही पाहा आकड्यातील तफावत
दैनंदिन अंत्यसंस्कार-२५
पोर्टलवरील नोंद-७
------------
सर्वाधिक बळी ग्रामीण भागातच आहेत.
कोरोनाचे सर्वाधिक कोरोना बळींची संख्या ग्रामीण भागात आहे; मात्र कोरोनाने मृत्यू झालेले सर्वाधिक रुग्ण नगर शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल असल्याने महापालिका हद्दीत सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद होते. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत झालेले मृत्यूही ६० टक्के ग्रामीण भागातीलच असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात २५४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
---------------
महापालिका, जिल्हा रुग्णालय वॉररुम
महापालिकेत रुग्णांची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. खासगी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्युची नोंद दररोज घेण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. तेच मृत्युची नोंद पोर्टलवर करतात; मात्र खासगी रुग्णालयांकडून जेव्हा नोंद येईल, त्याचवेळी समावेश केला जातो. जिल्ह्यातील कोरोनाबाधित, घरी सोडलेले रुग्ण यांची दैनंदिन नोंद घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातही यंत्रणा कार्यरत आहे.
-------
जिल्हा परिषद वॉर रुम
जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक कक्ष कार्यान्वित आहे. तिथे एक कर्मचारी नियुक्त असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधित, घरी सोडलेले रुग्ण, ग्रामीणमध्ये झालेला मृत्युसंख्येची नोंद घेतो. ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे पाठवली जाते.
------------
...तर फटका बसू शकतो
रोज झालेल्या मृत्युची नोंद रोज पोर्टलवर झाली तर आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो; मात्र मृत्युची नोंद झाल्यानंतर त्याची नोंद चार दिवसांनी होत असेल तर संबंधित परिसरात उशिराने उपाययोजना केल्या जातात. तोपर्यंत कोरोनाचा प्रसार झालेला असतो, त्यामुळे उशिराने झालेल्या नोंदीचा चांगलाच फटका बसतो.
------------
जिल्ह्यात कोरोनाने झालेल्या मृत्युची कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही; मात्र खासगी रुग्णालयांकडून मृत्युची माहिती उशिराने कळविली जाते. ज्या दिवशी माहिती मिळते, त्याच दिवशी पोर्टलवर नोंद होते; मात्र आता संबंधित सर्व कोविड रुग्णालयांना ज्या दिवशी मृत्यू झाले, त्याच दिवशी माहिती पाठविण्याबाबत बजावले आहे.
-शंकर गोरे, महापालिका आयुक्त
---
डमी आहे