अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असतानाच पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने उद्योजक व कामगार धास्तावले आहेत. गावी परत जावे की इथेच थांबून रहावे, अशा द्विधा मन:स्थितीत कामगार आहेत.
कोरोनाची पहिला लाट भयावह होती. लॉकडाऊन लागल्याने कारखाने बंद झाले. कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. त्यामुळे त्यांनी घरचा रस्ता धरला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने उद्योजकांनी कामगारांना बोलावून घेतले. कसेबसे काम सुरू झाले. कारखाने पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. कारखान्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. सरकारनेही लॉकडाऊनची तयारी केली आहे. त्यामुळे आम्ही गावाकडे जावं का, अशी विचारणा कामगार उद्योजकांकडे करू लागले आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे कामगारांचे हाल झाले. गावी जाण्यासाठी त्यांना वाहने मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकजण पायी गावाकडे गेले होते. गतवर्षीप्रमाणे यावेळी अशी परिस्थिती आपल्यावर ओढावणार नाही ना, अशी भीती कामगारांना आहे.
यावेळीचा लॉकडाऊन पूर्वीसारखा असणार नाही, फार तर १५ दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात तुमची सर्व काळजी घेऊ, पण परत गावाकडे जाऊन नका, अशी विनंती उद्योजक कामगारांना करत आहेत. परंतु, हाताला काम राहिले नाही तर घरी बसवून कसे चालेल? असा त्यांचा प्रश्न आहे. कामगारांची घालमेल सुरू आहे. येणाऱ्या काळात काय होईल याचा निश्चित अंदाज बांधणे कठीण असल्याने उद्योजक व कामगार धास्तावले आहेत.
....
जिल्ह्यातील कारखाने
९५०
....
दुकाने
८००००
.....
परप्रांतीय कामगार
१३६६५
....
मागील लॉकडाऊनमध्ये परत गेलेले कामगार
३४११
....
दोन लाख कामगारांचा जीव टांगणीला
कारखान्यांत काम करणारे
५०००० कामगार
..
दुकानांमध्ये काम करणारे कामगार
७३०००
.....
बांधकाम कामगार
५६८३५
....
माथाडी कामगार
२८६६
.....
सुरक्षा रक्षक
४०५
......
कामगारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने उत्पादनही थांबले आहे. गावाकडे जावे की कसे, अशी विचारणा कामगार करू लागले आहेत. अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कामगारांची काळजी घेऊन कमी अधिक प्रमाणात काम सुरू आहे. पण, लॉकडाऊन लागू झाल्यास काय करायचे? असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे.
- मिलिंद कुलकर्णी, उद्योजक
.....
कामगारांना चालू महिन्याचा पगार दिला आहे. गावी जावे की इथेच थांबावे, अशा द्विधा मन:स्थितीत कामगार आहेत. लॉकडाऊन पूर्वीसारखा नाही. १५ दिवस लॉकडाऊन राहून, असे चित्र सध्या तरी आहे. परंतु, पुढे काय होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योजक आणि कामगारही संभ्रमात आहेत.
- संजय बंधिस्टी, उद्योजक