अहमदनगर: ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.७) दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशव्यापी निषेध व संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय संघर्ष समिती गेली सात वर्षापासून पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथे मागील ५ वर्षापासून साखळी उपोषण सुरु आहे. अत्यंत कमी पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे अनेक ईपीएस ९५ धारक जग सोडून जात आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पेन्शनधारकांना महागाईच्या काळात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शनवाढसह त्यांचे आरोग्याचे प्रश्न व इतर प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी संघटना आग्रही असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
किमान पेन्शनमध्ये १००० रुपये वरून ७५०० रुपये पर्यंत वाढ करावी, सर्व पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा द्यावी, मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्या, नॉन ईपीएस ८५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा ५ हजार रुपये द्यावी आदी मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढला जाणार असल्याचे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संपत समिंदर यांनी सांगितले.